आई तू गेलीस पण...


सौ सरिता सुरेश कानडे
जन्म २१ नोव्हेंबर १९५२
मृत्यू २७ मार्च २०१९


"आणखी एक वर्ष उंबरठा ओलांडत आहे. वर्षाखेर नेहमी एकच प्रश्न पडतो काय कमावलं आणि काय गमावलं... खरं तर आपण कधीच काही गमावत नाही... नेहमी कमावतोच...  पण यंदा ख-या अर्थानं मी बरंच काही गमावलं. यंदाचं वर्ष माझ्यासाठी तसं थरारकचं ठरलं... आईनं जगातून घेतलेली exit... काळीज थरारून निघालं.  २०१८मध्ये झालेल्या अपघातातून जरा कुठं मी स्वतःला सावरत होते... आणि भरारी घेण्यासाठी हात उंच करत होते... त्यात आईच्या या exitनं सर्वच समीकरण कोलमडली. आम्हाला अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागत होतं."

काहीजणांचा जन्म हा शापित असतो. त्यांच्या आयुष्यात नेहमी थरार असतो....  सतत मोठमोठाली वादळं त्यांच्या आयुष्यात घोंघावतात आणि त्यांना शांत करण्यामध्ये अनेक महिने निघून जातात. कधी कधी वर्ष देखील उलटतात...  आमचं ही काहीसं असंच आहे... यावेळा  आमच्या आयुष्यात आईच्या जाण्यानं नवीन वादळ निर्माण झालं...  ती गेली आणि आपल्या म्हणवणा-यांनी नवीन खेळ आरंभला... (काही वर्षापूर्वी यातून मुक्ती मिळावी म्हणून आम्ही (मी आणि माझी बहिणी) अज्ञातवासात गेलो होतो)... लोकं काय म्हणणात याकडे आम्ही कधीच लक्ष दिले नाही.... सर्वांना नेहमीच फाट्यावर मारलं... पण यंदाची वेळ वेगळी होती... पोरक्याची भावना आणि त्यातच टोचून बोलणारी सो कॉल्ड आपली जवळची माणसं... यात आधार तो केवळ आमच्या आधारस्तंभाचा अर्थाच बाबांचा...

आमच्यासाठी बाबा आमचं दैवत... त्यांनी प्रत्येकवेळा आम्हाला प्रत्येक गोष्टीत आधार दिला (कोणत्याही प्रसंगी... आणि ते ही काहीही न बोलता...). म्ही त्यांना सावरण्यापेक्षा या सो कॉल्ड जवळच्या टोमण्यांच्या वावटळीतून आम्हाला सावरण्यासाठी आणि लढण्यासाठी परत त्यांनीच पुढाकार घेतला...  आमचे निर्णय कसे योग्य होते? आई असती तर तिनं काय सांगितलं असतं... अशी समजूत त्यांनी काढली.  आता तिला जाऊन वर्ष होईल पण आताच घडलेली घटना वाटते.

आईचं व्यक्तिमत्व तसं कडक... कोणालाही पटकन आवडणार नाही... पण तिच्या कर्तृत्वाचा डंका मात्र चारीही दिशाना पसरलेला... तिला लोकं जोडणं आवडायचं... लोकांची बोलायची इच्छा नसली, त्यांनी तोंड वाकडी केली तरी आमची आई मात्र न आढेवेढे घेता सर्वांशी बोलायची. कधी ती चुकीचं बोलली तरी लगेच १० वेळा सॉरी म्हणायाल घाबरणार नाही.  बरेचजण तर तिचे फोन उचालयचे नाहीत पण आता तेच तिच्या फोनला मिस करतात.

आम्ही आईला खूप त्रास दिला. का नाही देणार? आम्ही मोजून खरी पाच माणसं...  बाकी सगळे फक्त पैशात नातं मोजणारे... आणि आम्ही कसे वाईट आहोत हेच सिद्ध करणारे... अनेकजण आमच्या परिस्थितीमुळं, आमच्या राहणीमानामुळं बघणंसुद्धा टाळायचे. असा माझा अनुभव... त्यामुळं जे काही होतं ते आई, बाबा, आणि भाऊ बहिणं... घरात फक्त जगण्यापुरता पैसा... आणि दुस-यांकडून काही मागणं म्हणजे पाप... त्यामुळे आईनं लहानपणापासूनच आहे तेवढ्यात जगायला शिकवलं...  त्यातून भरारी घेत नवीन काहीतरी करायचं आणि या चक्रातून सुटायचं यासाठी आम्ही खूप मेहनत केली... शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर जेमतेम म्हणजे अगदी १२वीत लग्न होतं की काय ?  इतके आम्ही तिघं सुमार होतो. पण फक्त काहीतरी करायचं या जिद्दीनं आम्ही लढलो... कुणाची पर्वा म्हणजे अगदी आईचीही पर्वा न करता लढलो... तिच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले...

पण काळ प्रत्येकाला उत्तर देतो. तेच झालं माझ्या नापास होणा-या भावानं कर्तृत्व गाजवलं आणि मोठा झाला... आम्हीही पत्रकारितेत गेलो.... टीव्हीवर दिसायला लागलो... आमची लग्नासाठी कोणाकडे काहीही मागितलं नाही... आमचं संपूर्ण आयुष्यच बदललं... आमच्या आईला वाळीत टाकलेल्या या लोकांनी अचानक तिचे गुणगान गाण्यास सुरूवात केली.... एकेकाळी वेड्यात काढणारी लोक आता आपणहून बोलायला लागली... मला तर त्या शुक्रवारच्या कहाणीची आठवण होते... गरीब बहिण श्रीमंत झाल्यावर भावाचा बदललेला दृष्टीकोन... इथं भाऊ नाहीतर इतर मंडळी होती... त्यांना नावं ठेवायला कित्येक वर्ष जागा मिळत नव्हती...

आई निवर्तल्यावर परत हे टोमणे मारणारे जागृक झाले आणि आम्ही कशी आईची वाईट अपत्ये आहोत हे सांगण्यासाठी सरसावले... म्हणतात ना आपल्या शत्रूलाही असा वाईट अनुभव येऊ नये तितक्या वाईट अनुभवातून आम्ही जात आहोत.... हे अज्ञातवासाचं जगणं अजून किती दिवस चालेल काय माहीत? पण माझा काळावर नक्कीच विश्वास आहे... परत काळ बदलेलं... ही कुरघोड्या करणारी वावटळं परत आमच्या कौतुकाचा वर्षाव करतील...

खरंच आई तू गेलीस पण या वावटळांना तू शांत करू शकली नाहीस... यांना काय माहित तुझं आणि आमचं नक्की नात काय होतं?





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया