पुन्हा एकदा शाळेत जावेसे वाटते....
पुन्हा त्याच वर्गात... त्याच बेंचवर बसतांना संपूर्ण अंग शहारलं... ठेवणीतल्या आठवणी कुठून तरी वाकुल्या दाखवत होत्या... आणि मी त्या बेंचवर बसून १ ली ते १०वीच्या दिवसांमध्ये खरंच हरवून गेले ... आम्ही केलेली मस्ती... क्वचितच मारामारी... इतकंच नाही तर जुळ्या बहिणी असल्याने मी आणि माझ्या बहिणींनी दुस-यांना फसवण्यासाठी केलेल्या खोड्या.... दहा वर्ष ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो त्या शाळेत परत आल्यावर खुपच मस्त वाटत होतं... मुलीला सांगून निघाले होते आज मी ही शाळेत जाणार आहे आणि ती ही हे ऐकून मनापासून हसली... बाहेर निघतांना नेहमी मागे लागणारी माझी मुलगी आभाने आज मात्र हट्ट केला नाही... आणि परत लहान होण्याचा अनुभव घेता येणार म्हणून माझे डोळे चमकले.... तब्बल २० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणामुळे परत शाळेत येण्याचा योग आला... आणि असं वाटलं परत आपण लहान झालो आहोत... माझे मित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकदा भेटले... आमच्या पटांगणात लावलेल्या भव्य दिव्य सेटने आपली शाळा अगदी झळाळून निघाली होती... विशेष म्हणजे शाळेतला पहिला माजी विद्य...