पुन्हा एकदा शाळेत जावेसे वाटते....

पुन्हा त्याच वर्गात... त्याच बेंचवर बसतांना संपूर्ण अंग शहारलं... ठेवणीतल्या आठवणी कुठून
तरी वाकुल्या दाखवत होत्या... आणि मी त्या बेंचवर बसून १ ली ते १०वीच्या दिवसांमध्ये खरंच
हरवून गेले ... आम्ही केलेली मस्ती... क्वचितच मारामारी... इतकंच नाही तर जुळ्या बहिणी
असल्याने मी आणि माझ्या बहिणींनी दुस-यांना फसवण्यासाठी केलेल्या खोड्या.... दहा
वर्ष ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो त्या शाळेत परत आल्यावर खुपच मस्त वाटत
होतं...
मुलीला सांगून निघाले होते आज मी ही शाळेत जाणार आहे आणि ती ही हे
ऐकून मनापासून हसली... बाहेर निघतांना नेहमी मागे लागणारी माझी मुलगी आभाने आज
मात्र हट्ट केला नाही... आणि परत लहान होण्याचा अनुभव घेता येणार म्हणून माझे डोळे
चमकले....
तब्बल २० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणामुळे परत शाळेत येण्याचा योग आला...
आणि असं वाटलं परत आपण लहान झालो आहोत... माझे मित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकदा
भेटले... आमच्या पटांगणात लावलेल्या भव्य दिव्य सेटने आपली शाळा अगदी झळाळून
निघाली होती... विशेष म्हणजे शाळेतला पहिला माजी विद्यार्थीसुद्धा या कार्यक्रमाला
उपस्थित होता... गेल्या ५० वर्षातील सर्व माजी विद्यार्थी या संमेलनाला उपस्थित
होते... प्रत्येकाचे अनोखे योगदान होते... आपल्या आयुष्यातील उतार चढावांवर मात
करत या पडावावर येतांना हा दिवस एका अर्थाने खरंच विशेष दिवस होता... संपूर्ण
पटांगण माजी विद्यार्थ्यांनी गजबजले होते...

अनेकांनी वेगवेगळे सादरीकरण केले... पण यातही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला होता.... अनेकजण आज एक वेगळ्या उच्च पातळीवर पोहचलेले आहेत पण त्यांचा विद्यार्थी आजही तसाच लहान आहे... संपूर्ण सेटपासून ते अगदी प्रत्येक कलाकारांच्या सादरीकरणापर्यंत सर्वांनी काही महिने अहोरात्र मेहनत घेतली आहे...
शाळेच्या वेबसाइटचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.
https://mvsdattanagar.in/
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेचं नाव घेतलं तरी आजही अभिमानाने हो हो अभिमानाने ऊर भरून येतं... आजही मी स्वामी आणि ते ही दत्तनगरची विद्यार्थिनी आहे सांगायला जीभ कचरत नाही... खरंच याचं नक्की कारण काय? कारण आमच्या सारख्या सामान्य नाही तर अती सामान्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी आमची शाळा आणि आमचे शिक्षक.... आमच्या शिक्षकांनी दिलेले बाळकडू आजही आमच्या जीभेवर रेंगाळत आहे...
कार्यक्रम संपल्यानंतरही
आमचे पाय तिथेच रेंगाळत होते.... खरंच पुन्हा शाळेत जावेसे वाटते... आणि लहान
मुलांप्रमाणे बागडावेसे वाटते.... पण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी...













टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा