अशीही गुरूपौर्णिमा....


आज गुरूपौर्णिमा... आपल्या गुरूबद्दलची कृतज्ञता दाखवण्याचा दिवस... आपल्यातील अहम् पणा कमी करायचा असेल तर नक्कीच आपण नतमस्तक होणे गरजेचे आहे... अशा गोष्टी खरंच आपल्याला उमगतात??? आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट आज ना उद्या नक्कीच मिळतेच.... नृत्य आणि माझं नात असंच आहे. मी बरेच वेळा याचा उल्लेख अनुभूती म्हणून करते. ती अनुभूती ज्याने आपल्याला आपल्या आयुष्याचा  उद्देश मिळतो. किंवा आपलं जीवन सार्थकी लागलं याची जाणीव होते.
मी उत्तम नृत्यांगना आहे असं म्हंटलं तर खरंच हास्यास्पद होईल... पण हां..... नृत्यामुळे मला नक्कीच जगण्याची जाणीव होते. आमच्या बाईंना संगिताचार्य सौ वैशाली दुधे आणि तायांना बघूनच उत्तम नृत्यांगना म्हणा किंवा हृदयातून शिकणे काय असते हे कळते.  आणि तिथेच आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी नातं तयार होतं.
या सर्वांची परवणी बघणे म्हणजे गुरूपौर्णिमेचा दिवस.... गेली पाच वर्ष मी मंजिरी नृत्यकला मंदिर अर्थात आपल्या क्लासची गुरूपौर्णिमा जगत आहे. एकवेळ होती गुरूपौर्णिमेसाठी मी ही स्वामींच्या देवळाबाहेर लांबलचक रांगेत उभी असायची... एका छोट्याशा क्षणासाठी... माझ्या गुरूंना भेटण्यासाठी... पण क्लासच्या गुरूपौर्णिमेनंतर स्वामी मला नृत्यातून भेटायला यायला लागले....
आजच्या या political जगामध्ये अशीही गुरूपौर्णिमा ज्यात आमच्या सिनिअर्स (वयाने नाही तर कतृत्वाने... यातील कित्येकांची वय आज 20 सुद्धा आहेत) बाईंसाठी सरप्रायझेस देतात. मस्का पॉलिश करणा-या आजच्या जगात आजही आपल्या बाईंना आपल्याकडून आनंद कसा मिळेल याकडे लक्ष वेधणा-या विद्यार्थिनी... आणि त्यातलीच आता मी एक होणार आहे याची जाणीव... सगळंच अकल्पनीय आहे... आणि पत्रकारितेतील 15 वर्षाच्या अनुभवानंतर तर सगळंच अद्भुतच म्हणायला हवं....  पण यंदा ही गुरूपौर्णिमा अनुभवणं थोडं धुसरच आहे... कोविडनं माझा हा आनंद हिरावलाय... पण तरीही आज मी खूप खुष आहे... मला माझ्या नृत्यगुरू तशाच दिसत आहेत ज्या गेल्यावर्षी मी अनुभवल्या....
या कठिण प्रसंगीही गेले चार महिने आमच्या बाईंनी ऑनलाइन क्लास घेत आहेत...  माझा वर्क फॉर होममुळं क्लास अटेंड करणं खरंच अशक्य... पण तरीही मी कधीकधी क्लास अटेंड करते आणि माझ्या आत्मिक सुखाचा अनुभव घेते.... माझी सगळी टेंशन यावेळेत कमी होतात आणि परत नव्याने कामाला लागते... पण आमच्या साधनेसाठी योग्य असलेली वास्तु आमचा क्लास आम्ही खुप मीस करत आहोत.... ऋतुजा, वैभवी, सायली, केतकी ला मिस करत आहोत... आमच्या त्या गुरूला मिस करत आहोत... ज्या एक माणूस म्हणून खुप गोड हसून आपलं स्वागत करतात... पण एखादा पाय जरी चुकला तरी अगदी तोंड वाकडं करून आम्हाला ओरडणा-या आमच्या बाईंना मिस करत आहोत....

आपल्या आयुष्यात भेटणारं प्रत्येकजण वेगळं असतं. काहीजणांबरोबरचं नातं तर न समजलेलं... आपण सहज एखाद्या व्यक्तिच्या प्रेमात पडतो... यालाच गतजन्मीचे ऋणानुबंध म्हणतात.... माझ्यासाठी बाई तशाच आहेत... अशी हरवलेली व्यक्ति जी खूप वर्षांनी सापडली... आणि  माझा आनंद गगनात मावेनासा झाला...
माझ्यासाठी मला कळलेल्या आपल्या बाई म्हणजे... कोणाचंही नृत्य सुरू होऊ दे... बाई ठेका धरतातच... कोणीही चुकत असलं तर परत नव्या हिरीरीने पुन्हा करायला सांगतात.... पण त्यातही नियम लागू... तुम्ही नृत्यसाधना मनापासून केलेली पाहिजे....   तरच आणि तरच त्या तुमच्या पाठीशी त्या मस्तपैकी उभ्या राहतील... तुम्ही किती उत्तम नाचता यापेक्षा तुम्हाला त्याची खरंच किंमत आहे का यावर त्यांचं नृत्याचं  प्रेम मिळतंच मिळत... मग त्याला वयाची अट नाही....   त्या  प्रत्येक विद्यार्थिनींना सहज ओळखतात.... मनाच्या एक्सरे मशिनच म्हणा ना... मला अनुभवायला मिळालेल्या माझ्या गुरू शब्दात व्यक्त करणे शक्यच नाही.... त्यांच्या  प्रत्येक नृत्यामध्ये देवाला भेटण्याचा आनंद मिळतो... पट्टीच्या नृत्यांगना ब-याचा आहेत पण त्या गुरू असतीलच  असं नाही... फक्त नृत्य शिकण्याने आपण उत्कृष्ठ डांसर होऊ शकतो... पण समृद्ध आणि संपन्न होणं म्हणजे काय हे बाईंच्या एका नजरेतून जाणवतं... त्या माणूस म्हणून खुप सुंदर मनाची बाई... कुणाशीही सहज बोलतात... त्यांच्या रागवण्यातही गोडवा आहे... इतकं मोठं व्यक्तिमत्व असून त्या आजही जमिनीवरच राहणं पसंद करतात... त्यांच्यातील समृद्ध, काळजी करणारी, समजावणारी, ओरडणारी, आई आपण सहज शोधू शकतो...
 यंदा नेहमीप्रमाणे गुरूपौर्णिमा साजरी होणे शक्य नाही... मान्य आहे... पण  बाई तुम्ही आमच्यासाठी खासकरून माझ्यासाठी मनाच्या स्थानावर आहात जिथे मी तुम्हाला मनाने सुद्धा नमस्कार करेन आणि तो तुमच्यापर्यंत पोहचेलंच पोहचेल... आपला गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम खरंच उधार राहिला...



आजही मला कोणताही तोडा लगेच येत नाही... यासाठी मला जबरदस्त मेहनत घ्यावी लागते...  माझ्या तायाही यासाठी खूप मेहनत घेतात... पण यातून मला मिळणारं समाधान खुप आहे... मी या समाधानासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत... स्तोत्र, पाठ, पूजा, हवन आणि हो अगदी प्राणायामसुद्धा... पण ज्यादिवशी मी पहिला धा माझ्या पायाने मारला त्या दिवसापासून आयुष्य बदललं... मला आत्मिक सुख मिळालं... माझ्यातील राग कमी झाला.... स्वतःला ओळखायला लागले... स्वामींच्या कृपेमुळे मला जगायची खरी ओळख मिळाली... माझं नृत्याबरोबरचं नक्की नातं काय आहे सांगू शकत नाही... पण ही एक शांततेची सुरूवात आहे....

आजही मला विचारतात की नृत्य शिकून तू पुढे काय करणार आहेस... आजही मी हेच सांगते मी नृत्य माझ्या परमात्म्याला भेटण्यासाठी शिकते... मला यातून कोणताही नफा नको... 

@भाग्यश्री खेडकर 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया