अशा विचारांचं काय करायचं....



आज हवामान खात्यातील डॉ. मेधा खोले यांची खूप आठवण झाली. दोन वर्षापूर्वी त्यांच्या सोवळ्याच्या बातमीनं  सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ माजवली होती. त्यांची आठवण येण्याचं कारणही खूप STRONG आहे. गणपती आणि त्या दरम्यान घेण्यात येणा-या पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या. आजच्या २३-२४ वर्षांच्या मुलींचे विचार ऐकले आणि आजही विचारांचे वारे भुरसटलेल्या विचारांमध्येच गुंतले आहे. आणि त्यावर संस्कृतीचा वर्ख चढवला जातो आहे.

वेळ सकाळची.... ट्रेनमध्ये गणपतीसाठी गावी जाण्याची धामधूम सुरू होती. त्यातच लग्न न झालेल्या मुलींचा गहन विषय सुरू झाला गणपती दरम्यान येऊ घातलेली पाळी... आणि पाळी पुढे जावी म्हणून आपण कशा गोळ्या घेणार आहोत. इतर वेळा २३-३४ वर्षांच्या मुलींनां बायका म्हंटलं की तोंड वाकडी होतात. आम्ही अजून मुलीच आहोत हे निक्षून सांगायलाही कमी करत नाहीत.  पण आज त्यांचे विचार ऐकले आणि पायाखालची जमीन सरकली.

गणपतीमध्ये आमच्या घरी कसा जल्लोष असतो. त्यात पाळी आली की कशाप्रकारे बाजूला बसवतात आणि मग आपल्याला किती वाईट वाटतं.... हे सर्व या मुलींनी बोलायला सुरूवात केली. आणि त्यावर उपाय म्हणजे पाळी थांबवण्यासाठी वापरण्यात येणा-या गोळ्या.... हे सगळं खरंच भयंकर आहे... काही वर्षापूर्वी म्हणजे अगदी आताच साधारण ७ ते ८ वर्षापूर्वी तुम्ही हेच ऐकलं असतं तर तेव्हा मुली गोळ्या घेणं टाळायच्या. याला कारण त्यांचे डॉक्टर होते. डॉक्टर आम्हाला या गोळ्यांचे साइट इफेक्ट आणि या गोळ्या का टाळाव्या याचं महत्व पटवून द्यायचे. त्यावेळी ज्या मुलींनी डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं नाही त्यांना यांचे दुष्परिणाम आजही जाणवतात. त्यात महत्वाचं म्हणजे पाळी लवकर जाणं. मी काही डॉक्टर नाही पण जे ऐकलं ते सांगितलं.
गणपती हे दैवत अगदी कठोर असा एक समज आहे. त्यांचं आगमन आणि त्यादरम्यान असणारा उत्साह भलेही व्दिगुणित असला तरी महिलांसाठी कधी कधी हा उत्सव वर्मी लागतो. कारण असतं त्यांची मासिक पाळी. डॉ खोले यांच्या सोवळ्याबद्दल सर्वांनी खरंच आक्षेप घेतला, त्यांच्या विरोधात काय बोलले गेले नाही. अगदी त्यांचं शिक्षण, जात सर्व काही काढलं गेलं. पण दरवर्षी उद्भवणारा सो कॉल्ड प्रॉब्लेम मासिक पाळीबद्दल कोणी पुढाकार घेतांना दिसत नाही. सर्व जातींमध्ये आजही हे एक पाप समजलं जातं. डॉ. खोले चुकीच्या असतील तर हे कोण आहेत?
आपल्या जीवाशी खेळण्यापेक्षा आणि या गोळ्यांचे इफेक्ट सहन करण्यापेक्षा याविरोधात आपण लढायला नको का? आणि लढता येत नसेल तर खरंच मग बाजूला बसा.... पण अशा गोळ्या घेणं खरंच टाळा... असं म्हणायची वेळ आली आहे. पुढच्या पिढीला आपण काय देतो आहोत हे ही महत्वाचं नाही का?
माझ्या एका ग्रुपवर मी या विरोधात आवाज उठवण्यासाठी पोस्ट टाकल्या तर त्यांनी अशा पोस्ट का टाकल्या जातात आपण सुज्ञ आहोत अशी उत्तर देण्यास सुरू केली.  आणि अशा बायकांची खरंच किव आली. मी  या सर्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे मी ज्यांना आवडत नाही अशा ठिकाणी जाणं टाळतं. भुरसटलेले विचार लवकर धुवून जात नाहीत. पण आपण उचललेला खारीचा वाटा पुढची पिढी घडवतो. आपल्या एखादं वर्ष टाइमपास करता येणार नाही... आनंद साजरा करता येणार नाही... पण विचार बदलायला सुरूवात तर होईल... याचा आणि संस्कृतीचा खरंच काही संबंध नाही... आणि हो!!!! पाप तर मुळीचं लागत नाही.
आपण डोळे उघडे ठेवून जगायला शिकणं खरंच काळाची गरज आहे. संस्कृतीच्या नावाखाली जर गोळ्या घेतल्या जात असतील तर खरंच ही दयनीय बाब आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया