दुष्काळ विरोधातील गावक-यांच्या मोहीमेला डोंबिवलीच्या स वा जोशी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची साथ


एकीकडे महाराष्ट्रातील आंबेजोगाई तालुक्यामधील दुष्काळ आणि दुसरीकडे तिथल्याच काही गावांनी जलसंवर्धनासाठी उचलेला वसा... दुष्काळावर मात करण्यासाठी या गावक-यांनी पुढाकार घेतला आणि गावामध्ये विविध सरकारी योजना आणि खाजगी संस्थांच्या मदतीने पाणी अडवण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामासाठी श्रमदान करण्यास सुरूवात केली आहे. हे गावकरी सर्व भांडणतंटे, जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून एकजुटीने राबतांना दिसत आहेत. त्यांना विश्वास आहे यंदा तिथल्या जमिनीतील पाण्याचा स्तर वाढेल आणि त्यांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागणार नाही.यासाठी विशेष मेहनत घेत आहेत ते ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे. चिक्षेंचे गावामधील काम बघून स वा जोशीचे काही माजी विद्यार्थी एकत्र आले आणि सामाजिक जाणीवेतून त्यांनी त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचा विचार केला. त्यांनी काही पैसे जमा केले आणि दोन गावांच्या प्रकल्पांना मदत करण्याचे ठरवले. चिक्षेंच्या मार्गदर्शनामुळे आधीच गावकरी झटून कामाला लागले आहेतच. गेल्या आठवड्यात आम्ही तिथल्या गावांना भेटी दिली. यात कुंबेफळ, श्रीपतराय वाडी, धनोर, राडीतांडा या गावातील जलसंवर्धन कामाची पाहणी केली.





कुंबेफळ
कुंबेफळ.... आंबेजोगाई तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव... या गावाची एकूण लोकसंख्या ३३०० असून ५३० घरे आहेत. गेली काही वर्ष इथले गावकरी दुष्काळाचे चटके अनुभवत आहेत. इथे पिण्याच्या पाण्याची चणचण भासत होती. पण अखेर या दुष्काळापासून दोन हात करण्यासाठी इथल्या गावक-यांनी धर्म, जात आणि राजकारण बाजूला ठेवून श्रमदान करण्याचे ठरवले आणि हिरीरीने कामाला लागले.
गेल्या वर्षी इथल्या एका शेतक-याने आपल्या शेतातील मुरूम खोदून पाणी अडवले आणि त्याचा परिणाम उत्तम मिळाला. याचा अनुभव गाठीशी घेऊन आणि ज्ञानप्रबोधिनीच्या प्रसाद चिक्षे यांच्या मदतीने इथले गावकरी पाणी साठवण्यासाठी डिसेंबरपासून कामाला लागले. यासाठी सरकाच्या उपक्रमांचाही या गावक-यांनी लाभ घेतला.
गावचे तरूण सरपंच प्रमोद मधुकर भोसले यांनी सांगितले की, 'या कामांमुळे गावक-यांचा हुरूप वाढला आहे. लहान मुलांपासून ते अगदी वरिष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण जोमाने काम करत आहेत. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवण्यात येणार असल्याने यंदा पाऊस बेताचा झाला तरी  दुष्काळाला नामोहरण करता येणार आहे.'
आतापर्यंत त्यांनी ५० विहिरींपैकी १५ नवीन विहिरी खोदल्या आणि उरलेल्या विहिरींचे पुनर्भरणाचे काम सुरू आहे. नव्या विहिरींसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी कायदा आणि योजनेच्या रोजगार हमी योजने अंतर्गत २०० मजूर काम करत आहेत. तसेच आतापर्यंत ४० बोअरवेल खोदण्यात आलेल्या आहेत. तसेच बांध बंदिस्ती, नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम, सामाजिक वनीकरण अंतर्गत झाडांसाठी खड्डे बनवणे, प्रत्येक घरांसमोर शोष खड्डे बनवणे अशाप्रकारची जलसंवर्धनाची कामे गावात जोमाने सुरू आहेत. अंबेजोगाई तालुक्यामध्ये अशाप्रकारे अनेक गावांमध्ये अशाप्रकारची कामे जोमाने सुरू आहेत.




धानोर 
कुंबेफळ गावाचा आदर्श समोर ठेवून त्याच्या जवळीलच धानोर गावाने याचा कित्ता गिरवला. सरपंच मेघराज सोमवंशी यांनी जलसंवर्धनाची माहिती घेऊन आपले गाव सुजलाम सुफलाम बनवण्याचा वारसा हाती घेतला. बचत गटाच्या माध्यमातून इथे पैसा जमा केला. आणि फेब्रुवारी महिन्यापासून इथे श्रमदानाला सुरूवात झाली. २५ ते तीस तरुणाने सुरूवात झालेल्या श्रमदानाला आज येथे साडेतीनशे ते पाचशे तरूण पुरूष महिलांची जोड मिळालेली आहे.  आपल्या गावाचे पाणी वाचवणे या एकाच ध्येयाने पछाडलेले हे गावकरी राबतांना दिसत आहेत.
गेली ३५ वर्षे हे गाव पाणी टंचाईला सामोरे जात आहे. पाण्याचा स्रोत चांगला नसल्याने मार्च महिन्यानंतर त्यांना सरकारच्या योजनेअंतर्गत उपलब्ध होणा-या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. गेल्या चार वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्याने यंदा जानेवारीपासून गावाला पाणी टंचाईचे चटके बसण्यास सुरूवात झाली. आज गावात पाण्याचा साधा टिपूसही नाही. बारा गाव पाणी टंचाई योजनेअंतर्गत गावाला पाणी ३५ किलोमीटर अंतरावरून टँकरने पुरवले जाते. अवघ्या दोन टँकरवर येथील गावक-यांना समाधान मानावे लागते. पण तरीही हार न मानता साडेचार ते पाच हजार लोकसंख्येच्या या गावाने श्रमदानाचा मार्ग निवडला. यंदा पिण्यासाठी तरी गावाला पाणी मिळावे म्हणून जलसंधारणाचे काम हाती घेतले.  
गावातील तरूण गुरूवार आणि शनिवार असे दोन दिवस काम करतात. आतापर्यंत गावातील शेतामधील बांध बंदिस्ती आणि बंधा-याचे काम चालू आहे. कोणत्याही संस्थेच्या मदत न घेता हे गावकरी स्वतःच्या बळावर दुष्काळाशी लढत आहेत.

श्रीपतराय वाडी
श्रीपतराय गाव दोन पावले पुढेच आहे. या गावानेही जलसंवर्धनासाठी काम केले आहे. गावक-यांनी एक पाऊल पुढे टाकत जलसंवर्धनासाठी विविध उपक्रमांना डिसेंबरपासून सुरूवात केली. प्रत्येक घरासमोर शोषखड्डे खणले आहेत. गावात ३४२ हेक्टर शेती आहे. सर्व शेतींमध्ये बांध बंदिस्तीचे काम दररोज सकाळी ६ ते १० पर्यंत केले जाते. यामध्ये छोट्या मुलांपासून ते अगदी म्हाता-या कोता-यांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो.  वृक्ष लागवडीसाठी आतापर्यंत ६०० खड्डे खणले आहे.  ४० शोषखड्डे, बोअरवेलचे पुनर्भरण, १५ विहिरींचे पुनर्भरण, नाला खोलीकरण असे विविध उपक्रम येथे राबवले जात आहे. रस्त्याच्या बाजूला वाहणारे पाणीदेखील जमिनीत मुरवले जावे यासाठी गावकरी चांगलीच मेहनत घेत आहेत. त्यांना नांदेड पॅटर्न राबवयाचा आहे. लवकरच इथे रुफ वॉटर हार्वेस्टिंगच्या कामालाही सुरूवात केली जाणार आहे.
सध्या प्यायला पाणी मिळेल अशी एकच बोअरवेल सुरू आहे. गेल्या वर्षी काही प्रमाणात केलेल्या कामाचे हे फळ म्हणायला हवे. पण एवढ्या मोठ्या गावात हे पाणी पुरेसे नाही. त्यामुळे यंदा भरपूर पाणी अडवून जिरवायचे यासाठी सर्वांनी मिळून श्रमदान करण्याचा संकल्प इथल्या गावक-यांनी सोडला असल्याची माहिती इथल्या महिला सरपंचांनी दिली.
इथल्या गावक-यांनी आतापर्यंत आपले गाव आदर्श गाव व्हावे म्हणून गेल्या पाच वर्षापासून विविध उपक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. ज्ञानप्रबोधिनी प्रसाद चिक्षेंनी केलेल्या मार्गदर्शनाने अनेक उपक्रम राबवले. हगणदारी मुक्ती, संत गाडगे महाराज स्वच्छता मुक्ती, तंटामुक्ती आणि जलव्यवस्थापन असे पुरस्कार या गावाला मिळालेले आहेत. तरीही यंदा त्यांना पाण्याची चणचण जाणवत आहे.




राडीतांडा
पावणे सहाला इथल्या गावक-यांची सकाळ होते. हातात फावडे कुदळ घेऊन इथले गावकरी पाणी वाचवण्याच्या मोहीमेला सुरूवात करतात. गावकरी सकाळी १० पर्यंत मेहनत करतात. राडीतांडाचे सरपंच गोविंद वेणू राठोड यांच्या मदतीला सुरूवातील ५० तरुण आले आणि त्यानंतर बाकीच्यांना याचे महत्व समजावण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले आणि सर्वजण कामाला लागले. साता-यातील हिवरे गावांनी राडीतांडाच्या सरपंचांचे मन वळवले. तिथले जलसंवर्धनाचे काम बघून आपल्या गावालाही पाण्याच्या कमतरतेपासून दूर सारण्याचा वसा इथल्या सरपंचांनी घेतला आणि तो गावक-यांनाही दिला.
आता पर्यंत गावक-यांनी नाला रुंदीकरण, २२०० सीसीटी, आणि श्रमदानातून शेतामध्ये बांधबंदिस्तीच्या कामांनाकडे लक्ष दिलेले आहे. सामाजिक वनीकरणासाठी माती परिक्षण करून आवळा आणि आंबा लागवड करणार आहेत. त्याला ठिबक सिंचनाचा वापर केला जाणार आहे.
राडीतांडा गाव तसे लहानच . इथे अवघे १२० घरे आहेत आणि येथील लोकसंख्या ९९३ आहे. एकाच जमातीतील लोक या गावात राहतात. येथील गावकरी हातभट्टीची दारू बनवण्याचे काम करत. पण प्रसाद चिक्षेंनी इथल्या गावक-यांना जलसंवर्धनाचा केवळ मंत्रच दिला नाही. तर दारू मुक्त गाव करण्यासाठी गावक-यांना प्रोत्साहन दिले.
या गावामध्ये १९७२ मध्ये जलसंवर्धनाची कामे झाली त्यानंतर येथे असे कोणतेही काम झालेले नाही.  यंदा त्यांचा राबता बघता त्यांना विश्वास आहे की, पहिल्या पावसातही त्यांचा १०० टक्के फायदा होणार असा विश्वास गावकरी व्यक्त करत आहेत.

या गावक-यांचे काम बघून अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. आणि ते विविध प्रकारची मदत करत आहेत. डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी काही रक्कम जमा करून या गावक-यांना मदत केली आहे. आणि त्यांचा हुरूपही वाढवलेला आहे. यावरच हे विद्यार्थी थांबले नाहीत तर दर आठवड्यातून एकदा याच्यामधील काही माजी विद्यार्थी या गावांमध्ये जातात आणि तिथल्या कामांमध्ये हातभार लावतात. भविष्यातही अशा प्रकारे आम्ही चांगल्या उपक्रमांना हातभार लावू असा विश्वास हे विद्यार्थी व्यक्त करतात.
सामाजिक भान राखत प्रत्येकाने केवळ पैशांच्या स्वरुपातच नाही तर तिथे जाऊन मेहनत करणेही तितकेच महत्वाचे आहे.






जलसंवर्धनाची करण्यात आलेली कामे.
गावकरी करत असलेली जलसंवर्धन कामे कोणती आहेत. आणि याचा फायदा काय आहे. याची माहिती जाणून घेऊया.
सीसीटी बंधारा - चर पाच मीटर लांब आणि दोन फूट रुंद आणि एक फूट खोल. चरा काढून त्यात पाणी अडवून जिरवले जाते. याचा फायदा म्हणजे एका खड्ड्यामध्ये २० वेळा पाऊस झाला आणि २० वेळा पाणी मुरले तर १७ हजार लीटर पाणी मुरते. याला सीसीटी म्हणतात असे २२०० सीसीटी बनवलेले आहेत.



सीसीटी बंधारा

नाला खोलीकरण - पन्नास फूट लांब दोन खड्ड्यांमध्ये पाच मीटरचे अंतर आणि सहा ते सात रुंद आणि १० फूट खोल नाला जेसीबीच्या माध्यमातून खोदण्यात आले आहेत. याचा फायदा म्हणजे हे खड्डे उतारावर करण्यात आलेले असल्याने एका खड्ड्यातले पाणी दुस-या खड्ड्यात जाईल. जेणेकरून पाणी जमिनीत मुरण्यास सुरूवात होईल आणि जमिनीची धूप होणे थांबेल.







शोष खड्डे - पाच बाय साडेतीन या आकारामध्ये खड्डे खणून, त्यात अर्धा फूट गोटे टाकतात त्यावर सिमेंटचे मोठे पाईप टाकले जातात. या पाइपाच्या मोठे होल पाडण्यात येतात.  याचा फायदा म्हणजे आपण कपडे, भांडी आणि अंघोळीसाठी वापरत असलेले पाणी यात जमा केले जाते. त्यामुळे पाणी साठवण्यास मदत होते.  यामध्ये टाकलेले गोटे पाणी जमिनीपर्यंत लवकर पोहचवण्याचे काम करतात. जेणेकरून पाणी वाया न जाता ते स्रोतापर्यंत पोहचण्यास मदत होते. आणि हजारो लीटर पाण्याची बचत होते.





रेन वॉटर हार्वेस्टिंग- छपरांवर पडणारे पावसाचे पाणी जमा करून ते पुन्हा जमिनीत सोडण्यासाठी केलेली व्यवस्था. यामुळे पावसाचे पाणी वाय न घालवता ते जमिनीत मुरवले जाते. यामुळे जमिनी खालील पाण्याच्या स्रोतामध्ये हे पाणी पुन्हा जाते आणि आणि पाण्याची पातळी वाढते.


बोअरवेल आणि विहिरींचे पुनर्भरण - बोअरवेल आणि विहिरींमधील मातीचा उपसा काढला जातो. यामुळे पाण्याचा बुजलेला स्रोत पुन्हा एकदा जिवंत होण्यास मदत मिळते. तसेच यासाठी विशेष गोट्यांचा आणि मुरूमचाही वापर करण्यात येतो. यामुळे पाणी जमिनीमध्ये लवकर मुरते आणि त्याचे शुद्धीकरण होते. परिणामी विहिरी बुजण्याचे प्रमाणही कमी होते.






टिप्पण्या

  1. भारतीय जैन संघटनेनेही दुष्काळमुक्त अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या. https://www.facebook.com/shantilal.muttha/ , https://plus.google.com/u/1/+ShantilalMuttha , http://bjsindia.org/

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोविड आणि Work From Home (WFH)

कोविड आणि मीडिया